आरबीआयकडून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा… होम लोन EMI होणार कमी , रेपो रेट आला 6 टक्क्यांवर

मुंबई : भारतामधील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केली जात असल्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे. यावरून आता गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्ज अधिक स्वस्त होणार असून कर्ज घेतलेल्यांनाही मासिक इएमआयमध्ये मोठा दिलासा मिळणार असल्याचे आता म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. यावरून रिझर्व्ह बँकेकडून हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आरबीआयने रेपो रेट 25 बेसिक पॉइण्ट्सने म्हणजेच पाव टक्क्यांनी कमी करुन 6.25 टक्के इतका केला होता. पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट 6.25 टक्क्यांवर गेलेला असतानाच आता त्यामध्ये पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात करुन तो 6 टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे. यामुळे आता गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. अमेरिकेच्या नव्या आयातशुल्कामुळे जगभरातील भांडवली बाजारामध्ये मोठी खळबळ माजली आहे. भारतात सेन्सेक्स तब्बल २३०० अंकांनी तर निफ्टी ८०० अंकांनी गडगडला होता. पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवल्याने भांडवली बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. या वर्षी इन्फेशन म्हणजेच महागाईचा दर हा 4.2 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच आरबीआयला दर कपात करणं शक्य झाल्याचं सांगितलं जात आहे.