प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी रतनमोहिनी दादीजी यांचे अध्यात्मिक संदेश आणि सेवा सदैव स्मरणात राहील – मंत्री चंद्रकांत पाटील

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील अबू रोड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठाच्या प्रमुख आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचे निधन झाले आहे. त्या १०१ वर्षांच्या होत्या. दादीजींनी आपल्या तपस्वी जीवनातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले. संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ब्रह्माकुमारींच्या प्रमुख १०१ वर्षीय राजयोगिनी दादी रतनमोहिनी आता या जगात नाहीत. त्यांनी सोमवारी रात्री अहमदाबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी रतनमोहिनी दादीजी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांनी आपल्या अध्यात्मिकतेतून प्रेम, संयम आणि सेवेची शिकवण दिली आणि असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविले. त्यांचा अध्यात्मिक संदेश आणि सेवा सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असे पाटील म्हणाले.
चार वर्षांपूर्वी दादी हृदय मोहिनी यांच्या निधनानंतर, दादी रतनमोहिनी या संस्थेच्या मुख्य प्रशासक बनल्या. ही संघटना महिलाप्रधान आहे, ज्यामध्ये महिला नेतृत्वाची भूमिका बजावतात. जगभरात त्याची हजारो ध्यान केंद्रे आहेत. ही संस्था शाकाहार, व्यसनमुक्ती आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देते. ही संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली एक स्वयंसेवी संस्था आहे.