भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेण्याचे कारण काय? जयंत पाटलांचा सवाल

पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गर्भवती असणाऱ्या तनिषा यांच्यावर उपचारासाठी १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले होते. या मृत्यू नंतर हा विषय सर्व पक्ष संघटनांनी उचलून धरत आंदोलने केली, तर काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारकाशी निगडित डॉ. घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड केली.
या प्रकरणात जातीने लक्ष घालणारे भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी वेळोवेळी माध्यमांशी बोलताना या पूर्ण घटनेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असून त्या रुग्णालयाच्या प्रशासनावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. पण मागील काही दिवसांपासून त्यांचे मीडियाशी झालेले संवाद पाहता त्यांनी यु टर्न घेतला आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी बाबत फेसबुक पोस्ट करत टीव्ही ९ या चॅनेल ने केलेल्या बातमीचा संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये आमदार अमित गोरखे यांनी पूर्वी रुग्णालयावर आणि कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवत त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी भूमिका घेतली होती, रुग्णालय शासनाने ताब्यात घेतलं पाहिजे हे देखील ते म्हणाले होते आणि नंतर रुग्णालय उदात्त हेतूने सुरु असून, त्यांच्या चांगल्या कामाचे त्यांच्या कामाचे गोडवे गाताना गोरखे दिसत आहेत. आणि यासर्व प्रकरणात रुग्णालय दोषी नसून सर्वस्वी डॉ. घैसास दोषी असल्याचे सांगताना ते दिसत आहेत.
भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेण्याचे कारण काय? गोरखे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? गोरखे यांना कुणी, काही आदेश दिले आहेत का? असे विविध प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत असल्याचे जयंत पाटील म्हणतात. तसेच पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही. पण एका आईने जीव गमावला आहे याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा असे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.
Video Credits : Jayant Patil Official FB Page & Tv 9 Marathi