महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्माण केलेल्या ‘महाज्ञानदीप पोर्टल’चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

मुंबई : जगभरातील मराठी भाषिक व अभ्यासक यांना उपलब्ध असेल, अशा प्रकारचे डिजीटल शिक्षणाचे पोर्टल शासनाच्या अधिपत्याखाली देशात प्रथमच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘महाज्ञानदीप पोर्टल’ म्हणून निर्माण केले आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमातून ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेची संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली आहे. समान संधी व गुणवत्ता आधारित तत्वानुसार सर्वांना विविध विषयांचे ऑनलाईन उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले कि, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या शीर्ष नेतृत्वाखालील राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एस. एन. डी. टी. विद्यापीठ मुंबई ही पाच विद्यापीठे या उपक्रमाची स्थापक विद्यापीठे म्हणून काम करत आहेत. ‘महाज्ञानदीप’ या ऑनलाईन पोर्टल उपक्रमाचे नेतृत्व करत असतांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यासाठी एक हजार MOOC तज्ञ प्राध्यापक तयार करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५० प्राध्यापक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षित प्राध्यापकांनीच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ( NEP – 2020) नुसार तयार केलेला ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ ( IKS – Indian Knowledge System – Generic) हा मराठी भाषेतील शिक्षणक्रम देखील आज या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.