उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन सर्वांना समान पाणीपुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे, चंद्रकांत पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : कोथरूड मतदारसंघातील वाहतूक सुधारणेच्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले आणि इतर अधिकाऱ्यांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यात प्रामुख्याने कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, पाषाण, सुतारवाडी आदी भागातील मिसिंग लिंक, पाषाण तलावाची स्वच्छता, कोथरूड मधील पाणीपुरवठा आदी प्रमुख विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी याविषयी माहिती देताना म्हटले कि, कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी जागा अधिग्रहण आवश्यक असल्याचे वारंवार बैठकांमधून सांगितले जाते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील जागा अधिग्रहण करण्यास संबंधित मालक सहकार्य करत नसेल; तर जमीन अधिग्रहण अनिवार्य करुन, रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन सर्वांना समान पाणीपुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी पाषाण तलाव स्वच्छतेबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, पाषाण तलाव स्वच्छता हा श्रद्धेचा विषय असल्यामुळे सदर काम उत्तम दर्जाचे होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. तसेच, बाणेर बालेवाडी मधील नागरिकांच्या मागणीनुसार नाट्यगृह उभारण्याबाबत झालेल्या चर्चेवर सकारात्मक प्रतिक्रिया देत या नाट्यगृहासाठी जागेचा तात्काळ शोध घेऊन; त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, प्रणिता पाटील, अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्या सह भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील आदी उपस्थित होते.