दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न… सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय मोफत दिव्यांग महाशिबिर, खराडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ८९२ जणांना मोफत कृत्रिम अवयव बसवून विश्वविक्रम करण्यात आला. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करून आणि सेवा आणि समर्पण हा भाव ठेऊन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा एक नवीन जागतिक विक्रम तयार केला. सेवेचाच भाव ठेऊन काम करणाऱ्यांसाठी विक्रम बनवावा लागत नाही तर तो एक विसावा असून हा प्रवास कधीच थांबत नाही. हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, वास्तविक, सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे महाशिबीराच्या आयोजकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन.
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, केंद्राचे विश्वस्त व प्रमुख विनय खटावकर, सचिव राजेंद्र जोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.