मिरज-पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन चार मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू … पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन

30

सांगली : मिरज-पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन चार मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हैसाळ येथील मृत महिलांच्या घरी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, दीपक शिंदे-म्हैसाळकर, सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर, दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्यासह चारही मृत महिलांचे कुटुंबिय उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेलेल्या म्हैसाळ येथील रेखा कांबळे, भारती कांबळे, कांचन कांबळे व राणी वडर या महिलांचा दिनांक 13 एप्रिल रोजी कुची येथे झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.

या कुटुंबियांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मिरज तहसीलदार यांनी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्चही देण्याचे त्यांनी आश्वासित केले. तसेच मृत महिलेच्या लहान मुलांना त्यांच्या शिक्षण, पालन, पोषणासाठी आवश्यक मदत करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नाना कांबळे, अशोक वडर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.