उच्च व तंत्रशिक्षण विभागाची ऐतिहासिक कामगिरी… महाविद्यालयांचा सर्व तपशील एका ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी “डॅशबोर्ड” विकसित – मंत्री चंद्रकांत पाटील

16

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यापीठांसह महाविद्यालयांचा सर्व तपशील एका ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “डॅशबोर्ड” विकसित करण्यात आला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या डॅशबोर्डमध्ये विद्यापीठांशी संबंधित प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर २६ सार्वजनिक विद्यापीठे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खाजगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. सदर डॅशबोर्ड उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे.

या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचाही वापर करण्याचे नियोजित आहे.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (ऑनलाइन) उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.