दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण गेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी शासन आणि मी स्वतः कुठेही कमी पडणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी भेट देऊन दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, आपण नेतृत्वावर विश्वास ठेवूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतिहास असाच आहे. ते कुठलाही हिशोब बाकी ठेवत नाहीत. सगळा देश हा आतंकवादाला कंटाळला आहे. सगळया जगाने आतंकवादाविरोधात एक समान प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्यांनी नरेंद्र मोदींवर विश्वास दर्शवत तेच याचा विरोध करू शकतात असे मत व्यक्त केले आहे. जगभरातून भारताच्या बाजूने समर्थन दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे मोदी याबाबत योग्य निर्णय घेतील असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरची आर्थिक जबाबदारी याबाबत माध्यमांनी पाटील यांना प्रश्न विचारला असतात ते म्हणाले कि, सरकार सगळ्या गोष्टींची काळजी करेल. जम्मूकाश्मीर सरकारने मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख घोषित केले आहेत, फडणवीस सरकारने देखील मदत घोषित केली आहे. जे महाराष्ट्रातील सहा जण गेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून त्यांना आपण कसा सपोर्ट करू शकू याची संपूर्ण काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. शासनसोबतच आम्ही देखील मदतीसाठी कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.