दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे जनतेला देखील चांगलंच समजलंय… चित्रा वाघ यांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल

178

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यंटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली. या दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. याचदरम्यान, राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. यावरून वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी वडेट्टीवार यांची चांगलीच कानउघाडणी केली.

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले कि, या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही..? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती,भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचं दुःख वाटतंय. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगताएत… हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होतंय…
पण काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारताएत.काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत, असे वाघ यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांनी पुढे म्हटले कि, अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा… दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे जनतेला देखील चांगलंच समजलं आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय…?, असा संतप्त सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

जिसने गवाया अपनों को वो खून के आसू रोये
हिंदू ही था निशाणा उनका यही है सच
पर ये झुठ बेचने मै ये खोए…. लक्षात ठेवा जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं घडलं नसल्याचं सांगत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले होते. पहलगाममध्ये जे काही घडलं आहे, त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती. 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही आहे. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. सरळ सरळ दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, अशाप्रकारच्या बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे, कुठलाही धर्म नसतो, दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे, असं वडेट्टीवार म्हणाले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.