शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आपल्या मायभूमीत येणार, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारचे मानले आभार

मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लंडनमध्ये लिलाव घेण्यात आला. ही ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने खरेदी करून इतिहासातील एका सुवर्णपानाचे रक्षण केले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा साम्राज्यातील एक ऐतिहासिक ठेव आपल्या मायभूमीत येणार आहे. या निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध इतिहासाचा सुगंध आजही इथल्या मातीत ओसंडून वाहतो आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेली महाराष्ट्रभूमी हिंदवी स्वराज्याच्या विजयाचे पोवाडे गात आहे. महाराष्ट्राला पिढ्यानपिढ्यांचा लाभलेला हा ऐतिहासिक वारसा अधिक समृद्ध व्हावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे पाटील यांनी म्हटले.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त काल अचानक येऊन महाराष्ट्रात धडकले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व या कामाची जबाबदारी देऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲड. आशिष शेलार यांनी रात्री उशिरा पर्यंत याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचने प्रमाणे ॲड. आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यासाठी हातळणी, वाहतूक व विमा खर्चासह सुमारे 47.15 लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे.