सांगलीतील राजवाडा चौकातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

52

सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त सांगलीतील राजवाडा चौकातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना खर्चिक आजारांवर उपचारासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, एक खिडकी प्रणालीद्वारे मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता जिल्हा स्तरावर पूर्ण क्षमतेने ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यावेळी पाटील यांच्या हस्ते फीत कापून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रूग्णांना आवश्यक माहिती जिल्हास्तरावरच मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तताही येथेच करून घेण्यात येणार आहे. रूग्णांना उपचाराकरिता शासकीय योजनांच्या लाभासाठी हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेचा वेळ व पैशाचीही बचत होणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, तहसिलदार लीना खरात, महावितरणच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.