संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यास आजपासून सुरुवात… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ संपन्न

87

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा भव्य जन्मोत्सव श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या भव्य ऐतिहासिक सोहळ्यात लाखो वारकरी आणि भाविक सहभागी झाले आहेत. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींचे दर्शन घेतले आणि धुपारतीचा लाभ घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळा निमित्त 3 मे ते 10 मे आळंदी येथे अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव आणि संगीत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी ज्ञानेश्वरी पूजन आणि वीणापूजन करत या सोहळाला सुरुवात करण्यात आली. हे पूजन वारकरी संप्रदायात असणारे मुख्य सांप्रदाय प्रमुख डॉ. नारायण जाधव महाराज यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आलं आहे.

ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज चंद्रकांत पाटील यांना सहभागी होण्याचे भाग्य लाभले. लाखो वारकऱ्यांच्या सोबत हरिनामाच्या गजरात, ज्ञानेश्वरी पारायणाच्या अलौकिक श्रवणाने मनाला एक वेगळेच समाधान लाभले असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सर्वांना माऊलींच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.

सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल झाले आहेत. नामवंत महाराजांच्या भजन, कीर्तन आणि प्रवचनचं आयोजन आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे. 10 मे रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.