हडपसर पुणे ते जोधपूर आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल ते जोधपूर या दोन ट्रेनमुळे रेल्वेचे जाळे विस्तारण्यासोबतच पुण्याहून जोधपूरकडे जाणाऱ्या राजस्थानी प्रवाशांची मोठी सोय होणार – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : हडपसर पुणे ते जोधपूर (प्रतिदिन) आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल ते जोधपूर (भगत की कोठी) अशा दोन रेल्वे एक्स्प्रेसला पुणे स्थानकावरून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले आणि सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतजी, डॉ. एल. मुरुगनजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. मेधाताई कुलकर्णी, खा. श्रीरंग बारणे, पी.पी. चौधरी, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राजस्थानी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण होत आज प्रत्यक्षात पुणे-जोधपूर या दैनंदिन रेल्वे गाडीचा शुभारंभ अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे रेल्वे स्टेशनवरुन करण्यात आला. रेल्वे क्र. २०४९५ आणि क्र. २०४९६ आता पुणे-जोधपुर दरम्यान दैनंदिन स्वरुपात धावणार आहे. या दोन ट्रेनमुळे रेल्वेचे जाळे विस्तारण्यासोबतच पुण्याहून जोधपूरकडे जाणाऱ्या राजस्थानी प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले कि, पुणे स्थानकावर चार नवीन फलाट तयार होत आहे. त्यासाठी बारकाईने आम्ही सूचना केल्या आहेत. पुण्यातील स्थानक हे अगदी पुण्याला साजेसे मॉडर्न स्थानक तयार केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, गेल्या १० वर्षांत रेल्वेचा कायापालट झाला असून रेल्वेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रात रेल्वेच्या १ लाख कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. तसेच पुणे स्टेशनचा पूर्णपणे कायापालट होणार असून भव्य-दिव्य आणि अत्याधुनिक सोईसुविधांसह साकारले जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजीनगर, हडपसर आणि उरुळी स्टेशनचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.