सांगली जिल्ह्यातील विविध स्मारकांच्या आराखड्याची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सांगली : सांगली जिल्ह्यातील विविध स्मारकांच्या आराखड्याची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या विविध स्मारकांची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी पाटील यांनी बैठकीत दिले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सूचना दिल्या कि, 80 ते 90 टक्के काम पूर्ण असलेल्या स्मारकांचे काम तात्काळ पूर्ण करुन त्यांचे लोकार्पण करण्यात यावे. इतर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक मंजूरी व निधीसाठी पाठपुरावा करून त्यांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देखील यावेळी दिले.
बैठकीदरम्यान क्रांती अग्रणी जी.डी बापू लाड यांचे कुंडल येथील स्मारक, स्वर्गीय आर आर पाटील यांचे सांगली येथील स्मारक, हिंदकेसरी मारुती माने यांचे कवठेपिरान येथील स्मारक, नटसम्राट बालगंधर्व यांचे मौजे नागठाणे येथील स्मारक, अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम, शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकास आराखडा, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे शिराळा येथील स्मारक, आटपाडी येथील कै. ग. दि. मा नाट्यगृह इमारतीचे बांधकाम, स्वर्गीय पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे वाळवा येथील स्मारक, स्वातंत्र्यसैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे मौजे येडेनिपाणी येथील स्मारक, मौजे बलवडी येथील क्रांती स्मृतीवन इत्यादी कामांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.