भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा… पुणे शहरासाठी धीरज घाटे यांची पुन्हा निवड तर, पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी शत्रुघ्न काटे यांच्याकडे

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक 58 जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिलाध्यक्षांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुणे शहरासाठी धीरज घाटे यांनाच कायम ठेवण्यात आले असून , पिंपरी-चिंचवड शहरासाठी शत्रुघ्न काटे, आणि पुणे उत्तर (मावळ) साठी प्रदीप कंद यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपने कोकण, पश्चिम महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत अशा प्रदेशात राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 58 जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील निवडणुका गेल्या महिन्याभर सुरू होत्या. पहिल्यांदा मंडल अध्यक्षांची निवडी झाल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.