लहान मुलांवर आध्यात्मिक संस्कार घडवणाऱ्या गुरुकुलाच्या कामासाठी आवश्यक ते अनुदान दिले जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील माळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य वारकरी संमेलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वारकरी बंधू भगिनींशी संवाद साधला.या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले हे मी माझे परमभाग्य समजतो. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामाच्या बदल्यात आपण सर्वांनी जे प्रेम दिलेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला करवीर नगरीचा पाठींबा जास्त मिळाला. आपण दिलेल्या आशीर्वादाने सर्व आमदार खासदार निवडून आले असाच आशिर्वाद कायम असू द्या अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले , आध्यात्मिक अधिष्ठान, वारकरी परंपरा ही राजकीय परंपरेपेक्षा उच्चस्थानी आहे असे मानणारा मी आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात अमरावती, बीड, आळंदी, बुलढाणा अशा अनेक ठिकाणी पार पडलेल्या आध्यात्मिक सोहळ्यांना मी आवर्जून उपस्थित राहिलो होतो. मुख्यमंत्री असताना विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालत काम केले. पंढरपूरची वारी असो किंवा देवस्थानांचा विकासासाठी निधी असो हिंदुत्वाचा विचार सर्वदूर पोहचावा यासाठी जे काही शक्य होते ते सगळे केल्याचे याप्रसंगी आवर्जून त्यांनी नमूद केले.
हभप मल्लप्पा वासकर महाराज ते हभप विवेकानंद वासकर महाराज यांच्यापर्यंत ही एक समृद्ध परंपरा आहे. १९९४ ते १९९९ पर्यंत विवेकानंद वासकर बुवा हे पंढरपूरच्या मंदिराचे विश्वस्त होते. दोन पानं आणि दोन मनं हे त्यांचे जीवनसुत्र होते. दररोज दोन झाडे लावणे आणि दररोज दोन जणांना व्यसनमुक्त करणे हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जोपासले. राणा महाराज्यांच्या पुढाकाराने लहान मुलांवर आध्यात्मिक संस्कार घडवणाऱ्या गुरुकुलाचे काम सूरु आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्याला जे अनुदान आवश्यक आहे ते नक्की दिले जाईल असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच तुमच्या फडाच्या वतीने हाती घेतलेले काम थांबणार नाही, असे त्यांना आश्वस्त देखील केले.
यावेळी कणेरी मठाचे मठाधीपती परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, स्वामी मंगलगिरीजी, परमपूज्य विठ्ठल महाराज चवरे, भागवत महाराज हांडे, माधवदास राठी महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने, प्रकाश आवाडे, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, उद्योग सेनेचे उदय सावंत, कार्यक्रमाचे संयोजक राणा महाराज वासकर तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.