अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…. महायुती सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन – छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,तसेच येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ जी यांनी आज, महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. भारतीय संविधानाची तत्वे, विचार व आदर्शांवर चालत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा या निमित्ताने केला असल्याचे मत छगन भुजबळ यांनी मांडले. मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकारकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती पार पाडणार असल्याची पहिली प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
राजभवनात आज सकाळी दहा वाजता हा शपथ विधी सोहळा पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालणार आहे. महायुती सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांना दिली.
भुजबळ यांनी शपथविधी नंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे आभार मानले आहे.
छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका देखील केली होती. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.