शरद पवार यांना धक्का… माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी, राधेश्याम चौधरी, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, उबाठा गटाचे शहर प्रमुख सोमनाथ देशमुख आदींनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पराग मोरे हे जळगाव दुध संघाचे संचालक आहेत. या सर्वांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची संघटना आणखी बळकट होईल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
बावनकुळे यांनी सांगितले की गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची संघटना आणखी वेगाने वाढते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात प्रवेश केलेल्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असेही बावनकुळे यांनी नमूद केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.