बीबीए आणि बीसीए पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई : बीबीए आणि बीसीए पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता, लवकरात लवकर सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना योग्य वेळी पुढील वाटचाल करता यावी, या हेतूने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल बी. रेड्डी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.