डॉ. प्रमोद चौधरी लिखित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न

पुणे : प्रसिद्ध उद्योजक आणि ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रमोद चौधरी यांच्या अद्वितीय उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरुन’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या खास सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन डॉ. प्रमोद चौधरी यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले.
डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासारख्या नाविन्याचा ध्यास असणाऱ्या संशोधकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करतांना आनंद होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुस्तकाचे सिंहावलोकन करतांना त्यांचे जीवन आणि संघर्षासोबत पुढच्या पिढीसाठी त्यांनी मांडलेले विचार महत्वाचे वाटतात. एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व त्याच्या विचारातून लक्षात येते. पुस्तकातून डॉ. चौधरी यांच्या जगण्यातील मूल्ये कळतात, त्यांनी कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश लक्षात येते. गुणवत्ता, तंत्रज्ञान, विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केले.
पुस्तकातून २००९ ते २०१४ या संघर्ष काळातील उद्योगाची स्थिती मांडण्यात आली आहे. इथेनॉलच्या संदर्भात तत्कालिन प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी असतांना अनुकूल निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या काळात आलेल्या संकटावर डॉ. चौधरी यांनी नवे उपाय योजून यशस्वीपणे मात केली. २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात इथेनॉलबाबत अनुकूल धोरण लागू करण्यात आले. हे धोरण प्रभावी लागू करण्यासाठी डॉ. चौधरी यांच्या सुचनेनुसार त्यात आणखी चांगले बदल करण्यात आले आणि त्यातून २० टक्क्यापर्यंत इथेनॉलचे संमिश्रण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून एकप्रकारे १ लाख कोटीपेक्षा अधिकचे परकीय चलन वाचवू शकत आहोत. या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला तंत्रज्ञान आणि सहकार्य प्राजने पुरविले, अशा शब्दात फडणवीस यांनी डॉ. चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला.
देशासमोर प्लास्टिकचे संकट फार मोठे आहे. अविघटनशील प्लास्टिकच्या विघटनाचे तंत्रज्ञान प्राजमध्ये तयार करण्यात येत आहे. याच्यावर आधारित उद्योग देशात उभे करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी मार्गदर्शन केल्यास अर्थकारण आणि पर्यावरण दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. चौधरी यांचे हे राष्ट्रकार्य असेच सुरू रहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमात प्रकाशक विशाल सोनी, प्रा. मिलिंद जोशी, प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासह कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.