सकाळ समुहाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक जीवनावर आधारित ‘नितळ’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उत्साहात संपन्न

12

पुणे : सकाळ समुहाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक जीवनावर आधारित ‘नितळ’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मंगळवारी पुण्यात करण्यात आले. यानिमित्ताने पाटील यांची प्रकट मुलाखत देखील घेण्यात आली. सार्वजनिक जीवनात काम करताना, ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ हा माझा नेहमीच मंत्र राहिला आहे. भविष्यातही याच मंत्रावर मार्गक्रमण करीत राहणे, हा माझा जीवन संकल्प राहिल, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यासोबतच सकाळ समूहाने माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडल्याबद्दल, मी विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो, असे देखील पाटील यावेळी म्हणाले.

मला राजकारणातील लोभाचे आकर्षण कधीच वाटले नाही. आपल्याला आवश्यक तेवढे घ्यावे, बाकी इतरांना द्यावे, दुसऱ्यांना मोठे करण्यातच मला आनंद आहे. हेच काम मी आत पुण्यासह अन्य ठिकाणी करत आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कार्यकर्ता ते नेता असा प्रवास मांडला. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या प्रवासामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. या अनुषंगाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी सकाळने ‘नितळ’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी पाटील यांची मुलाखत घेतली.

यावेळी पाटील यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडत गेला. त्याचे वडील गिरणी कामगार, स्मग्लरचा भाग असलेला रे रोड या भागात ते राहायचे. बीकॉम केल्यावर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दोन वर्ष पूर्णपणे काम केले. त्यांनी १३ वर्षे पूर्णवेळ काम केल्यावर ते कोल्हापूरला परतले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिली. पुढे जाऊन ते कोल्हापूर मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांना पुण्याला कोथरूडमध्ये निवडणूक लढण्याचा आदेश दिला. पुण्यात त्यांना विरोध झाला. ब्राम्हणाची जागा काढून घेतली टीकादेखील करण्यात आली. पण टीकेकडे लक्ष न देता निवडणूक लढले आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले. हा एकूण प्रवास यावेळी पाटील यांनी सांगितला .

यावेळी सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत काकडे, प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पुणे महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.