धर्मांतरणासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्याच्या गर्भवतीची आत्महत्या… ऋतुजाला न्याय मिळावा आणि तिच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी – भाजप आमदार चित्रा वाघ

162

सांगली : धर्मांतरणासाठी सासरच्यांनी इतका छळ केला की त्यांच्या जाचाला कंटाळून ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्याच्या गर्भवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.आज भाजप आमदार चित्रा वाघ यांनी तिच्या माहेरी भेट दिली. तिचे आई-वडिल यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऋतुजाचे वडिल चंद्रकांत पाटील यांनी जी आप बिती सांगितली ते ऐकून खरंच तळपायाची आग मस्तकात गेली असल्याचे वाघ यांनी म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले कि, एका धनगर कुटुंबात जन्मलेल्या ऋतुजाचे लग्न २४ मे २०२१ ला सुकुमार राजगेशी झालं. हिंदू धनगर आहोत असं खोटं सांगून राजगे कुटुंबियांनी सोयरिक जुळवली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. लग्नानंतर ऋतुजाला झालेली फसवणूक कळाली तरीही ती संसार करत होती. पण खरं तर तेव्हापासूनच ऋतुजाचा धार्मिक कोंडमारा सुरू झाला. इतकंच नाही तर नवरा सुकुमार राजगे याच्यासह सासू-सासऱ्यांनी ऋतुजाला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर, आमच्याबरोबर चर्चला चल, असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. बऱ्याचदा तिच्या मनाविरूध्द तिला चर्चमध्ये घेऊन गेले. तिथे तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीही करण्यात केली पण ऋतुजा बधली नाही. त्यावर चर्चमधील पादरींनी तिच्या सारच्या मंडळींना तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते, पूजा करते त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत, असं सांगितलं आणि तिच्या जाच वाढतच गेला. ती गर्भवती राहिली तेव्हा हा छळ अधिकच वाढला. पोटातल्या बाळावर ख्रिश्चन धर्माप्रमाणेच संस्कार व्हायला हवेत म्हणून तिच्या सासू-सासरे आणि नवऱ्याने तिचा इतका छळ केला की तिने टोकाचे पाऊल उचलत स्वतःला आणि पोटातल्या सात महिन्याच्या बाळाला संपवलं.

या प्रकरणी ऋतुजाला न्याय मिळावा आणि तिच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या करिता चित्रा वाघ यांनी सांगलीचे एसपी संदीप घुगे यांची ही भेट घेतली. ऋतुजाच्या वडिलांना योग्य ती मदत करण्यासंबंधी सूचना त्यांना दिल्या त्याच बरोबर धर्मांतरण करण्यासाठी जोरजबरदस्ती करणाऱ्या सासू सासरे आणि नवऱ्यासह चर्च मधील पादरी लग्न जुळवणारा व्यक्ती देखील दोषी आहे त्यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच हे प्रकरण DYSP कडे वर्ग करण्यात यावे अशा सूचना देखील त्यांनी केल्या. शिवाय यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा लवकरात लवकर लागू करायला हवाय, जर कोणी फसवून दबावाने किंवा मानसिक छळाने धर्म बदलायला लावत असेल तर तो गुन्हा ठरवणारी तरतूद या कायद्यात असावी, धार्मिक फसवणूकीच्या केसेससाठी विशेष तपास (SIT)स्थापन व्हावं, शहरी आणि ग्रामिण भागात धर्माच्या नावावर चालणाऱ्या अवैध प्रलोभनात्मक धर्मांतरण केंद्राची माहिती गोळा करून त्यांच्या वर कारवाई सुरू व्हावी या मागण्याही त्यांनी शासनाकडे केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक आहेत लवकरच या मागण्याची पुर्तता होईल असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. ऋतुजासाठी न्याय हा केवळ तिच्या कुटुंबापुरता नाही तर ही संपुर्ण महाराष्ट्रातल्या मुलींसाठी महिलांसाठी एक न्यायाची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.