हसत-खेळत, आनंददायी वातावरणात शिक्षण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगलीतील जिल्हा परिषद शाळा बामणोली तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक ७, सांगली येथे झालेल्या विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमास आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाटील यांच्या हस्ते तसेच अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेश व पुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच नव्या वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक बालकाला शाळेच्या पटावर नोंदवून दररोज गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. हसत-खेळत, आनंददायी वातावरणात शिक्षण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे सांगतानाच शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमांना खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते व महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.