जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

50

पुणे : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपस्थित राहून पाटील यांनी प्रशासन, महापालिका, पोलीस विभाग, स्वयंसेवक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशदेखील त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.