जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भक्तियोग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन… या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : उद्या शनिवार दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भक्तियोग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून भक्तीसोबत आता लाखो वारकरी योगासन, प्राणायाम आणि योगप्रसार करणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
सर्वांनी नक्की सहभागी व्हा!
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुण्यात मुक्कामी आहेत. याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकाराने येथे ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो वारकरी, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक योगासने करणार आहेत.
मुख्य कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ वाजता होणार आहे. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी शहरात सुमारे पाच लाख वारकरी, तसेच पुणेकर नागरिक सहभागी होतील. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.