जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुणे शहरात अत्यंत उत्साही वातावरणात आगमन.. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व वारकरी बांधवांचे केले पुण्यनगरीत स्वागत

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज पुणे शहरात अत्यंत उत्साही वातावरणात आगमन झाले. तुकाराम महाराज पादुका चौक येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे औक्षण करून भक्तिभावाने स्वागत केले. तसेच पालखीची आरती करून उपस्थित वारकरी बांधवांना त्यांनी प्रसाद वाटप केले. या सोहळ्याने परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला.
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पुण्यनगरीत दाखल झालेल्या सर्व वारकरी बांधवाचे राज्याचे चंद्रकांतदादा पाटील, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आलेल्या भक्तांना लाडू, पाणी आणि रेनकोट वाटप करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी वारीचा आनंद लुटला.
ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडं मार्गस्थ झाला आहे. आज या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. या दोन्ही पालख्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहेत.