सुंदर आणि निरोगी आयुष्यासाठी योग अतिशय आवश्यक असून, सर्वांनी योग केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत योगासने केली. या शिबिराच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त देशवासीयांना केलेले संबोधन हजारो योग साधकांसोबत ऐकले.
चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “सुंदर आणि निरोगी आयुष्यासाठी योग अतिशय आवश्यक असून, सर्वांनी योग केला पाहिजे,” अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित यंदाच्या या योग शिबिराचं आयोजन केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या सहकार्यातून करण्यात आलं होतं. गेली ११ वर्षे आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी जागतिक पातळीवर २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर जागतिक पातळीची उमटलेली ही एक मोहोरच होती. आज जगभरात योग साधनेचा झालेला प्रचार आणि प्रचार हे निश्चितच आजच्या जागतिक योग दिनाचं यश म्हणावं लागेल, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, भाजप कोथरुड मंडल मध्यचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.