‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले वृक्षारोपण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या “एक पेड माँ के नाम” या अभिनव उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी, कोथरूड मध्य मंडलच्या वतीनं म्हातोबा टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून या पर्यावरणपूरक उपक्रमात वृक्षारोपण केले. तसेच पेहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या स्मृतीप्रत्यर्थही वृक्षारोपण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत सर्व नागरिकांनी झाडे लावून त्यांचं जतन केलं पाहिजे असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण करत उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या संपूर्ण परिसरात २०० हुन अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.
वृक्षारोपण उपक्रमाचा उद्देश केवळ पर्यावरणाचे संरक्षण करणे एवढाच नाही, तर आपल्या आईप्रती आदरभावना आणि समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त करणे हाही आहे. मातृभक्ती आणि पर्यावरणसंवर्धनाचा संगम असलेल्या या उपक्रमातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, हीच सदिच्छा यावेळी मोहोळ यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.