गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

14

मुंबई : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

बैठकीत विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणूगोपालरेड्डी, उपसचिव प्रताप लुबाळ,डॉ. प्रशांत बोकारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सादर करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये प्रादेशिक गरजांनुसार अभ्यासक्रमांची आखणी, नवीन इमारतींचा आराखडा, संशोधन केंद्रे, डिजिटल शिक्षणसुविधा यांचा समावेश करावा आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना मदत करणारे संशोधन करावे आणि .आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनमानात परिवर्तन घडवण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घ्यावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखणे, गडचिरोली जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न, संधीच्या अभावामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आपल्या गावात’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचू शकत नसल्यास शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणे, शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे, या उपक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अर्धवट शिक्षण सोडलेले, शाळाबाह्य व इतर अडचणीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारीत शिक्षण देणे हा गोंडवाना विद्यापीठाचा मानस असल्याची माहिती देण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.