कोल्हापूर महानगरपालिकेतील तीन माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

75

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील तीन माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत केलं होतं. आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुखांना त्यांनी फोडलं. त्यानंतर आता तब्बल 20 नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे.

यामध्ये माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी महापौर सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी सभापती अभिजित चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर, माजी नगरसेविका रीना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, गीता गुरव, अनुराधा खेडेकर, अर्चना राजू पागर, सीमा कदम, कविता माने, सुनंदा मोहिते तसेच पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. यासोबतच पाचोरा विधानसभा मतदारसंघातील बंडू माने, सचिन मिस्त्री, अमोल मिस्त्री, किशोर सुतार, दंगल भोई, राकेश सुतार, शाळीग्राम सुतार, प्रवीण सुतार यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रमुख नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आले आहेत ही आनंदाची बाब आहे. विधानसभा निवडणुकीत याच कोल्हापूरातून आम्ही महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. आणि पाच आमदारांच्या रूपाने येथील जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले. गेल्या अडीच वर्षांत विविध विकासकामांसाठी आम्ही ४ हजार २०० कोटी रुपयांचा निधी या शहराला दिला. आता पुन्हा एकदा कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पालिकेवर भगवा फडकवायचा असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार जयश्री जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.