ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा ‘जीवनगौरव’ने सन्मान !

पुणे : बालगंधर्व रंग मंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेतर्फे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले . लीला गांधी यांच्यासारख्या कलाकारांचा गौरव हा केवळ व्यक्तीचा नाही, तर त्या शहराचा आणि क्षेत्राचाही गौरव असतो, असे मोहोळ यांनी म्हटले.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते-निर्माते प्रशांत दामले, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, डॉ. संजय चोरडिया, सिद्धार्थ शहा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बालगंधर्वचे प्रशासन अधिकारी राजेश कांबळे, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली १७ वर्ष बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुण्याची सांस्कृतीक ओळख जपण्याचे काम केले जात आहे. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ‘ब्लॅक अँड व्हाइट’च्या काळा पासून पाहत आलो आहोत. त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखणण्याजोगी आहे. लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द यावेळी मोहोळ यांनी दिला.
प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत. यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर, गडकरी रंगयातन आणि वाशीच विष्णुदास भावे नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत. एव्हडे केले तरी शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील. तसेच नाट्यगृहाशी संबंधीत लोकांना सोबत घेवून नाट्यगृहांचे नियोजन केल्यास ते अचूक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याच्या पहिल्या दिवसात मोहोळ यांनी सहभागी होत, कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला. ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, ज्येष्ठ समीक्षक जयराम पोतदार यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.