पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी!… हा निर्णय पुणेकरांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तब्बल 3 हजार 500 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, यामुळे पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मितीही होणार आहे. हा निर्णय पुणेकरांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती प्राप्त होईल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरी देण्यात आली. सध्याचा वनाज-रामवाडी कॉरिडॉर हा पहिला टप्पा आहे. त्याचा विस्तार वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी ला मंजुरी देण्यात आली आहे .एलिवेटेड कॉरिडॉर 12.75 किलोमीटरचा असेल, यामध्ये 13 स्टेशन असणार आहेत. बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोद्वारे जोडलं जाणार आहे. चांदणी चौक आणि वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे. यासारखे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.