सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये ५६६ वा क्रमांक…या कामगिरीमुळे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचा कौतुक सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये ५६६ वा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक आणि भारतामध्ये दुसरा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरची ओळख अधोरेखित केली आहे. विद्यापीठाच्या या सुरेख कामगिरीमुळे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचा कौतुक सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
चंद्रकांत पाटील यांनी या गौरवाच्या क्षणी उपस्थितीत राहून विद्यापीठाच्या संपूर्ण प्रशासन, व्यवस्थापन मंडळ, सिनेट सदस्य, प्राध्यापक वर्ग, आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ५४ भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. यात IIT मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. देशपातळीवरील QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत IIT दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे. यासोबतच QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार जागतिक पातळीवर IIT दिल्लीनं १२३ वा क्रमांक मिळवला आहे. जागतिक पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५६६ व्या स्थानी आहे, तर मुंबई विद्यापीठ ६६४ व्या क्रमांकावर आहे. देशपातळीवर ही विद्यापीठे अनुक्रमे १५ व्या आणि १८ व्या स्थानी आहेत.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.