संस्थेने स्वायत्त विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापनदिनाचा भव्य सोहळा महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, पद्मश्री ॲड .उज्ज्वल निकम, ॲड. बापूराव के. बर्वे यांच्यासह पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आले. संस्थेने संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे रुजवून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, एड. सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांना देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो याचा अभिमान वाटतो. राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची पायाभरणी याच संस्थेमधून झाली आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीने गेल्या ८० वर्षांत महाविद्यालये, वसतिगृहे आणि विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून समाजाला शिक्षण दिले आहे. या संस्थेने स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्वायत्त विद्यापीठ झाल्यास संस्थेला नवनवीन अभ्यासक्रम राबविता येतील असे सांगून पाटील यांनी संस्थेच्या विकासासाठी शासनाच्यावतीने सहकार्याची ग्वाही दिली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्था व वसतिगृहे निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न देखील हेच होते, असे सांगून आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी व युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. सन २०४७ पर्यंत देश विकसित भारत म्हणून उदयास येईल व डॉ आंबेडकर यांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त करताना विकास हा सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात 120 आधुनिक विद्यार्थ्यांची वसतिगृहे उभारण्याचा मानस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे, भीमा कोरेगावला 100 कोटींचा निधी, महाडच्या ऐतिहासिक चौदार तळासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.