सोलापूर शहरातील मौजे नेहरूनगर व मौजे मजरेवाडी येथील गुन्हेगार जमातीच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जमिनीच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

8

मुंबई : सोलापूर शहरातील मौजे नेहरूनगर व मौजे मजरेवाडी येथील गुन्हेगार जमातीच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जमिनीच्या संदर्भात विधान भवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जमिनीच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर शहरातील नेहरूनगर व मजरेवाडी परिसरातील माजी गुन्हेगारी जमातींच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात आलेली ३६ एकर जमीन संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार असून, लाभार्थ्यांची तातडीने निवड करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, सर्व समाजांतील पात्र लाभार्थ्यांची यादी त्वरीत तयार करण्यात यावी. यानंतर त्या-त्या समाजाच्या प्रतिनिधी संस्थांनी मिळून एकूण १४ गृहनिर्माण सोसायट्या स्थापाव्यात आणि प्रत्येकीसाठी एक स्वतंत्र ब्लॉक तयार करण्यात यावा.त्यानंतर लाभार्थ्यांच्या नावाने जमिनीचे उतारे तयार करून त्या अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात येतील.बावनकुळे यांनी सूचित केले की, जर एसआरए योजनेअंतर्गत काही घरांची व्यवस्था शक्य असेल, तर ती बांधूनही देता येईल. अन्यथा संबंधित सोसायट्यांना प्लॉट उपलब्ध करून दिले जातील. घरांची किंमत शक्य तितकी कमी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महानगरपालिकेकडून सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीने तयार करून घेण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे सोलापूरमधील वंचित माजी गुन्हेगारी जमातींना हक्काची घरे आणि सुरक्षित भविष्य मिळणार असून, सामाजिक समावेशाच्या दिशेने शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.