आगामी सणासुदीच्या काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती करा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. आगामी सणासुदीच्या काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती करा, असे निर्देश पाटील यांनी या बैठकीत दिले.
एमआयटी कॅालेजजवळ बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर तसेच, वाहतूक कोंडीला कारण ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा दर दहा दिवसांनी आढावा घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीला अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, पुणे महानगरपालिका शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, क्षेत्रीय उपायुक्त यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा कोथरुड मधील विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.