तमाशा सम्राट काळू-बाळू उर्फ कै. लहू-अंकुश खाडे यांचे तैलचित्र विष्णूदास भावे नाट्य मंदिर, सांगली येथे लावण्यासंबंधी सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेच्या विष्णूदास भावे नाट्य मंदिरात तमाशा सम्राट काळू-बाळू उर्फ कै. लहू-अंकुश खाडे (कवलापूरकर) यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप हि मागणी पूर्ण न झाल्याने सोमवारी ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी थेट विधानभवनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यासंदर्भात निवेदन दिले.
विष्णूदास भावे नाट्य मंदिरात अद्यापही लहू-अंकुश खाडे यांचे तैलचित्र लावण्यात आले नसल्याने, लोककलावंतांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी थेट विधानभवनात चंद्रकांत पाटील यांची भेट देत लेखी निवेदन सादर केले. तमाशा सम्राट काळू-बाळू उर्फ कै. लहू-अंकुश खाडे (कवलापूरकर) यांचे तैलचित्र विष्णूदास भावे नाट्य मंदिर, सांगली येथे लावण्यासंबंधी सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे यावेळी पाटील यांनी आश्वासित केले.
यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर, नासिकेत पानसरे, केतन खेडेकर उपस्थित होते.
काळू-बाळू ही जोडी तमाशा जगतात लोकप्रिय होती. काळू-बाळू या जोडीनं ग्रामीण भागात तमाशाचा प्रसार केला. तमाशाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केलं. गेली साठ वर्षे तमाशाच्या माध्यमातून त्यांनी आपली कला सादर केली. या क्षेत्रात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. काळू-बाळू या जुळ्या भावांनी एकाच वेळी संवाद उच्चारण्याची कला अवगत केली होती. त्यांचा ‘जहरी प्याला’ अर्थात काळू-बाळू हे वगनाट्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं.