कोल्हापूरचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, उत्तम कोराणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश… प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत

मुंबई : कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह उबाठा तसेच शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या पक्षप्रवेश सोहळ्याला आ. अमल महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत केले. संघटनात्मक बांधणी आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होवू देणार नाही, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा परिवार कटिबद्ध आहे, हे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. तुम्हा सर्वांच्या साथीने कोल्हापुरातील विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण होतील, तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा परिवाराला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. चव्हाण म्हणाले की या सर्वांच्या साथीमुळे कोल्हापुरातील विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. या सर्वांच्या विश्वासास सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पात्र ठरू अशी ग्वाही त्यांनी दिली.
पोवार आणि कोराणे यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. पोवार हे पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
करवीर तालुक्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये व्हिजन ग्रूपचे अध्यक्ष जनसुराज्य चे संताजी घोरपडे, काँग्रेसचे प्रसाद जाधव, वैभवराज राजेभासले, राजेंद्र थोरवडे तसेच मुंबईतील उबाठा गटाचे मंदार राऊत, संकेत रुद्र यांचा समावेश आहे.
चंद्रपूर येथील उबाठाचे जिल्हाप्रमुख व चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि उबाठाचे सभापती वासुदेव ठाकरे तसेच निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे आदी उपस्थित होते.