अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : नाशिक महापालिका क्षेत्रात येणाऱ्या अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य सीमा हिरे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सरोज अहिरे, सदस्य महेश लांडगे, राहुल डिकले, सदस्य अमित देशमुख, सदस्य नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ६८ किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्याच्या कामासाठी नाशिक महापालिक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये करार झाला आहे. यानुसार १५ किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात सातपूर विभागातील एमआयडीसी परिसरातील विविध रस्त्यांचे कामासाठी ३ कोटी ५० लाख तर नवीन नाशिक विभागातील औद्योगिक वसाहत मधील रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी ५० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या बरोबरच येणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने नाशिक औद्योगिक वसाहत परिसरातील आठ किलोमीटर रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या पुर्वी केलेली रस्त्यांची कामे, सन २०२५-२०२६ मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या कामांखेरीज जी कामे शिल्लक राहतील तिही प्राधान्याने केली जातील, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
या औद्योगिक वसाहती मधील ड्रेनेजचे कामाचा प्रस्ताव ‘अमृत-२’ मध्ये करण्यात आला असल्याचे नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड , नागपूर येथील औद्योगिक वसाहतीतील रस्ते व आणि सुविधा या संदर्भात बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.