चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भात शुक्रवारी एक महत्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे पार पडली.
यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असे पाटील यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्याबाबतही सविस्तर चर्चाही यावेळी करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठासाठी 414 कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यासोबत या संदर्भातील प्रस्ताव उच्च स्तरीय समितीकडे पाठविण्याचे पाटील यांनी विभागाला निर्देश दिले.
या बैठकीस माजी मंत्री व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते.