गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : पुण्यात आता गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरु झाली आहे. यासोबतच ढोल पथक देखील सज्ज होत आहेत. रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यातील गणेशोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असलेल्या श्रीराम ढोल पथक आणि रमणबाग ढोल पथक यांचे वाद्यपूजन उत्साहात पार पडले.
या निमित्ताने सर्व वादकांना चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, यंदा महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सवाला “राज्य उत्सवाचा” दर्जा बहाल केला असून, त्यासाठी तब्बल ६०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण राज्यात उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे. यावर्षी गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या वर्षी कोथरुड मतदारसंघात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना ढोल पथकांचा देखील यात समावेश केला होता. गणेशोत्सव काळात या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात डीजे मुक्त गणेशोत्सव उपक्रम राबवला तोच प्रयत्न पुण्यात होतोय याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून उपक्रमास पाठिंबा दिला.
यावेळी उद्योजक पुनीत बालन, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांच्यासह वादक तथा ढोल-ताशा पथकाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.