वांद्रे, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुंबई, २३ जुलै : वांद्रे, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली.
हे आधुनिक कार्यालय तांत्रिक शिक्षण व्यवस्थापनामध्ये अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुसूत्रता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मनोगत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) हे महाराष्ट्र राज्यातील एक स्वायत्त शिक्षण मंडळ आहे . ते संलग्न संस्थांना डिप्लोमा , पोस्ट डिप्लोमा आणि प्रगत डिप्लोमा कार्यक्रमांची रचना आणि अंमलबजावणी करते. संलग्न संस्था आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.