श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट यंदाच्या गणेशोत्सवात, ‘कैलास मंदिर, वेरुळ’ या दिव्य स्थापत्याची प्रतिकृती साकारणार… या देखाव्याचे ‘कळस पूजन’ उत्साहात संपन्न

पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी प्रमाणे जगप्रसिद्ध मंदिरांच्या भव्य आणि अत्यंत देखण्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा कायम राखत मंडळाकडून यंदाच्या गणेशोत्सवात, भारतीय वास्तुकलेचं अलौकिक रत्न- ‘कैलास मंदिर, वेरुळ’ या दिव्य स्थापत्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या देखाव्याचे ‘कळस पूजन’ आज संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून मुरलीधरजी मोहोळ यांनी यंदा महिलांना गणेशोत्सव काळात संयोजनाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. त्याबद्दल मुरली आण्णा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष पाटील यांनी अभिनंदन केले.
वेरुळ येथील कैलास मंदिर हे जगातील एक अद्वितीय शिल्पवैभव आहे. ८व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या कारकिर्दीत कोरलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर एकाच दगडात कोरलेले आहे – जे स्थापत्यकलेतील एक चमत्कार मानले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले हे मंदिर हे भारतीय स्थापत्य व मूर्तिशास्त्रातील सर्वोच्च शिखर आहे. या वर्षी आम्ही श्री गणेशाच्या देखाव्यासाठी हा वारसास्थळाचा विषय निवडला असून, यामागे भारतीय कला, संस्कृती, व इतिहासाचे भान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे, भाजप कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी नगरसेविका मोनिकावहिनी मोहोळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.