जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात नव्या पिढीच्या नारीशक्तीचा झंझावात! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने एक अभूतपूर्व कामगिरी करत भारताचीच अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हंपीचा पराभव करुन विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. ही कामगिरी केवळ एक विजय नाही, तर समस्त भारतीय तरुणींना स्फूर्ती देणारा आदर्श आहे. दिव्या देशमुख हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला आणि भारतालाही तुझा खूप अभिमान असल्याचे पाटील म्हणाले.
महाराष्ट्राच्या नागपूरची ही सुकन्या केवळ १९ व्या वर्षीच जागतिक पातळीवर यशस्वी ठरली, ही संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुरुष बुद्धिबळ क्षेत्रात विश्वनाथन आनंद, डी. गुकेश आणि प्रज्ञानंद ही नावे झळकतात. आता महिला बुद्धिबळ विश्वात नव्या पिढीची नारीशक्ती उदयाला येताना दिसते आहे आणि दिव्या देशमुख हे त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रॅण्ड मास्टर ठरल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधीत्व करत, ३५ वेळा पदक पटकाविले आहे. यात तब्बल २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे.