जत शहराच्या मध्यवर्ती भागातील वन विभागाच्या जागेवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

6

जत, सांगली : सांगली वन विभागाच्या अंतर्गत जत येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व वनपाल निवासस्थानाच्या नव्या इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . कार्यक्रमादरम्यान जत शहराच्या मध्यवर्ती भागातील वन विभागाच्या जागेवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी जतच्या पर्यटन विकासासाठी सुसंगत पर्याय सुचवण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या नव्या इमारतीमुळे वनविभागाच्या प्रशासनाला अधिक बळकटी मिळून नागरिकसेवेत कार्यक्षमता वाढणार आहे. जत परिसरातील पर्यावरणसंवर्धन व वनरक्षणाच्या कार्यात या इमारती महत्वपूर्ण ठरणार आहेत.

वन विभागाच्या दोन्ही इमारती राज्य योजना अंतर्गत बांधण्यात आल्या असून, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या इमारतीसाठी जवळपास २६ लाख, ५८ हजार रुपये इतका खर्च झाला आहे. वनपाल निवासस्थानासाठी जवळपास २३ लाख, ३३ हजार इतका निधी खर्च करण्यात आला आहे. नवीन इमारतीमुळे वनविभागाचे प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल पाटील, तसेच विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांची उपस्थिती लाभली.

Get real time updates directly on you device, subscribe now.