उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत राज्यातील कलाक्षेत्राच्या प्रगतीसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे फोटोग्राफी कोर्स सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ शालेय विद्यार्थ्यांसाठी उच्च कला परीक्षा, रेखाचित्र श्रेणी परीक्षा (प्राथमिक आणि माध्यमिक) आयोजित करते. सध्या मंडळातर्फे १० पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जात आहेत. दरवर्षी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधून सुमारे ८ लाख विद्यार्थी रेखाचित्र श्रेणी परीक्षा (प्राथमिक आणि माध्यमिक) देतात. उत्कृष्ट अभ्यासक्रम, प्रभावी अंमलबजावणी, शिस्तबद्ध परीक्षा प्रणाली हे मंडळाचे धोरण आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि प्रमाणपत्रे देणे हे अंतिम उद्दिष्ट आहे.