साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : जागतिक दृष्टिकोनाचे अजरामर दीपस्तंभ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

मुंबई : साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर काळाच्या चक्रात अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची शोध यात्रा असते. महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये जन्मलेले साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे असे लेखक होते, ज्यांनी आपल्या लेखणीने वाटेगाव ते रशियापर्यंतचा प्रवास केला. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या भारताच्या कार्यकर्त्यांचा चेहरा, आवाज आणि आत्मा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रकट झाला. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या आहेत.

पाटील यांनी म्हटले, बंगालची हाक, तेलंगणाचा संग्राम, पंजाबचा दंगा, गोवा मुक्तिसंग्राम, दिल्ली आणि महाराष्ट्र या भारतातील प्रमुख प्रदेशांमधील ऐतिहासिक घडामोडींवर अण्णा भाऊ साठे यांनी केलेले चिंतन हे विलक्षण सखोल आणि समर्पित होते. या भौगोलिक व सांस्कृतिक विश्लेषणामध्ये त्यांनी केवळ संघर्षाचे वर्णन केले नाही, तर या प्रदेशांची भारताच्या अखंडतेतील भूमिका अधोरेखित केली. “भारतभूमीची एकता, अखंडता, समानता आणि नागरिकांचे आनंदी आयुष्य हे अण्णा भाऊंच्या लेखनाचे मर्म आहे. त्यांच्या लिखाणातून एक राष्ट्रीय आणि मानवीकल्याणवादी स्वप्न सतत झळकत राहते.

अण्णा भाऊ साठे : जागतिक तत्त्ववेत्ते आणि सांस्कृतिक राजनैतिक विश्लेषक:

अण्णा भाऊ साठे हे केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, ते जागतिक विचारांचे तत्त्ववेत्ते होते. त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा हे याचे ठोस उदाहरण आहेत. जर्मनी, रशिया, पाकिस्तान यासारख्या देशांतील तत्कालीन राजकीय परिस्थितीचा त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा घेतला आणि भारताशी त्यांचे संबंध, परिणाम व परस्पर प्रभाव यांचा सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषणातून विचार केला. ही दृष्टी आजही आपल्याला थक्क करणारी आहे.त्यांच्या काळातील इतर मराठी लेखकांच्या तुलनेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत विचार करून लेखन करणारे अण्णा भाऊ साठे हे कदाचित एकमेव मराठी साहित्यिक असावेत. ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण आणि अग्रगामी भूमिका त्यांच्या लेखनातून सतत जाणवते. त्यामुळेच त्यांना केवळ दलितांचा साहित्यिक म्हणून नव्हे, तर जागतिक मानवतावादी लेखक,तत्त्ववेत्ता म्हणूनही आपण पाहिले पाहिजे.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम : अण्णा भाऊ साठे साहित्याचे पुर्नप्रकाशन

अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कार्याचा व्यापक परिचय नव्या पिढीला व्हावा, म्हणून महाराष्ट्र शासनाव्दारे ‘साहित्यरत्न्‍ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना दि.16 जून,2014 झाली. मी स्वतः या समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करतो आणि मला अभिमान आहे की, या समितीच्या वतीने तीन टप्प्यांत अण्णा भाऊ साठे यांच्या निवडक साहित्याचे पुर्नपप्रकाशन करण्यात आले आहे आणि हे खंड अत्यल्प दरात वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

या विविध खंडांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या, कथा, आत्मकथनपर साहित्य, लोकनाट्य, प्रवासवर्णन, गीते व कविता यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य सर्वसामान्य लोकांपर्यंत सहज आणि सुलभ स्वरूपात पोहोचवण्याचा शासनाचा दृढ निर्धार आहे.

नव्या तंत्रज्ञानातील साहित्यप्रवाह:

डिजिटल युगाच्या गरजेनुसार अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य ऑडिओबुक्स आणि ई-बुक्स स्वरूपातही शासनाच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि शब्द कधीही, कुठेही ऐकता-वाचता येतात. त्यांच्या साहित्यातील ऊर्जा ही आजही तितकीच जिवंत, संघर्षशील आणि प्रेरणादायी आहे.

राष्ट्रप्रेमाचा झंझावाती आवाज:

अण्णा भाऊ साठे हे आपल्या लेखणीतून सामाजिक क्रांतीचा मंत्र देणारे लेखक होते, पण त्यांची राष्ट्रभक्ती देखील तेवढीच ठोस होती. त्यांनी आपले साहित्य केवळ वर्ग संघर्षापुरते मर्यादित ठेवले नाही, तर राष्ट्रहित आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन हेच केंद्रबिंदू मानले. त्यामुळे त्यांचे लेखन सामाजिक न्याय आणि राष्ट्रप्रेम यांचा सुवर्ण संगम आहे.

मी का लिहितो याबद्दल अण्णाभाऊ आपल्या ‘ वैर ’ या कांदबरीच्या प्रस्तावनेत म्हणतात,”आपण सतत लिहित राहावे, जुन्या चालीरीती दूर कराव्यात आणि जुन्या पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढं आणाव,हेवे दावे,दुष्टावे, वैर याचा घोर परिणाम दाखवावा आणि या नव महाराष्ट्रात सलोखा वाढवा,जनता सुखी व्हावी, संपन्न व्हावी आणि महाराष्ट्रातील विषमता नष्ट झालेली पहावी अशी दृढ श्र्रध्दा घेऊन मी लिहितो.”असे स्वप्न अण्णाभाऊंनी पाहिले.

लेखाचा समारोप करताना हे नक्कीच म्हणावे लागेल की, सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी साहित्यरत्न,अण्णाभाऊ साठे यांनी केली ,यामुळे त्यांचे साहित्य जगभरात पोहोचले. मराठीचा सातासमुद्रापार झेंडा फडकवला गेला आणि याची परिणीती अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि रशियातील मार्गारिटा रुडामिनो विद्यापीठांच्या भव्य प्रांगणामध्ये संयुक्त उपक्रमांमधून मॉस्को या ठिकाणी उभारला गेला. यामुळे अण्णा भाऊ साठे हे केवळ दलित साहित्याचे आधारस्तंभ नव्हते तर ते एक व्यापक जागतिक दृष्टीकोनातून चिंतन करणारे मानवतावादी,समतावादी साहित्यिक होते म्हणून त्यांचे साहित्य नव्या माध्यमांतून, नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणून अण्णाभाऊंच्या 8कांदब-याचे हिंदी मध्ये , ३० कांदब-याचे इंग्रजी मध्ये, आणि २ पुस्तकांचे तमिळ भाषेत भाषांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासही महाराष्ट्र शासनाचे सहाय्य असेल. शासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यास अजरामर करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. तो एक सांस्कृतिक आणि बौद्धिक चळवळ आहे. यामध्ये सहभागी होणं म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नातील समतेच्या भारतासाठी योगदान देणं होय,असे मला वाटते, अशा भावना या लेखात पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.