राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

पुणे : राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड येथील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय आणि लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली.
मेधा कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले.