उन्नती आणि डेस्टिनेशन को-वर्किंग यांच्या वतीने ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म आणि प्रदर्शनाचे आयोजन… हा उपक्रम म्हणजे अनेक पिढ्यांचे एकत्रिकरण घडवणारा एक सुंदर अनुभव – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महिलांच्या उद्योजकतेला चालना देणारा आणि त्यांचा सामाजिक सहभाग वाढवणारा एक आगळा वेगळा उपक्रम आज पुण्यात पार पडला. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उन्नती आणि डेस्टिनेशन को-वर्किंग यांच्या वतीने ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांनी सहभागी सर्व लघु उद्योजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या उपक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘श्रावण फॅशन क्वीन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या मातोश्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपस्थितांना प्रेरणा दिली. हा उपक्रम म्हणजे अनेक पिढ्यांचे एकत्रिकरण घडवणारा एक सुंदर अनुभव ठरला, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन अमृता देवगावकर, मंदार देवगावकर यांनी केले. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे मधुकरराव पवार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.